अकोला : शहराच्या मध्यवर्ती भागातील राधाकिसन प्लाॅटमध्ये नालेसफाई करताना साेमवारी सकाळी महापालिकेच्या सफाइ कर्मचाऱ्यांना नाल्यात बंदूक आढळून आली. याप्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांना अवगत केल्यानंतर त्यांनी बंदूक ताब्यात घेतली.
महापालिकेच्यावतीने शहरात मान्सूनपुर्व नाले सफाइ केली जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला नाले सफाइचे काम पूर्ण करावे लागणार असल्यामुळे मनपातील सफाइ कर्मचाऱ्यांसह खासगी सफाइ कर्मचारी व इतर यंत्रणा कामाला लागली आहे. नेहमीप्रमाणे राधाकिसन प्लाॅटमधील मुख्य नाल्यांची साफसफाइ करण्यासाठी सफाइ कर्मचारी नाल्यात उतरले. यावेळी नाल्याची साफसफाई करत असताना एका कर्मचाऱ्याला बंदूक आढळून आली. या प्रकाराची सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी नाले सफाइच्या ठिकाणी धाव घेत बंदूकची तपासणी केली असता ती बंदूक छऱ्याची असल्याचे निदर्शनास आले. सदर बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
देशमुख फैलातील बेवारस बंदूकी काेणाच्या?रामदासपेठ पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील देशमुख फैलातील एका मंदिरालगत पिशवीमध्ये दाेन बेवारस पिस्तुल आढळून आल्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात उजेडात आला हाेता. या बेवारस पिस्तुल काेणाच्या, त्या मंदिरालगत काेणी आणून ठेवल्या याचा शाेध रामदास पेठ पाेलिसांना अद्यापही लागला नाही, हे विशेष.