अकोला : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत हमी दराची कापूस खरेदीचा मुहुर्त अखेर ठरला आहे. शनिवार, १५ नोव्हेंबरपासून हमी दराने कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये पणन महासंघाच्या अकोला विभागांतर्गत अकोला जिल्ह्यातील हिवरखेड व वाशिम जिल्ह्यातील कामरगाव या दोन केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करण्यात येणार आहे. दिवाळी होवून, पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी, यावर्षीच्या कापूस खरेदी हंगामात शासनाच्या हमी दराने कापूस खरेदी सुरु करण्यात आली नाही. खासगी पद्धतीने व्यापार्यांना कमी दराने कापूस विकण्याची पाळी कापूस उत्पादक शेतकर्यांवर आली. खासगी कापूस खरेदीत कापसाला कमी भाव मिळत असल्याने, शासनाच्या दरानुसार पणन महासंघाकडून कापूस खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात होती. अखेर शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघाकडून कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाकडून हमी दराने ३ हजार ८५0 रुपये ते ४ हजार ५0 रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये पणन महासंघाच्या अकोला विभागात पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील हिवरखेड व वाशिम जिल्ह्यात कामरगाव येथे या दोन खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी नेताना शेतकर्यांना सात-बारा उतारा आणावा लागणार आहे.
हमी दराच्या कापूस खरेदीचा मुहूर्त शनिवारी!
By admin | Updated: November 14, 2014 01:04 IST