अकोला: "ग्रीन झोन" निर्मितीचा उद्देश सफल व्हावा, यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआर तयार करण्यासाठी थेट शासन स्तरावरून एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. वातावरणातील बदलासाठी परिणामकारक वृक्ष लागवडीची गरज आहे. यामध्ये शहरातील उद्याने, बगीचांसह मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या शहरातील ओपन स्पेस, शासकीय जागांवर वृक्ष लागवड केली जाईल. यामुळे शहराच्या वातावरणात बदल होऊन तापमानात घसरण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
अकोलेकरांनो पुढाकार घ्या!
शहराच्या तापमानात होणारी वाढ लक्षात घेता वृक्ष लागवडीची जबाबदारी केवळ मनपा प्रशासनावर न सोपवता त्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, अपार्टमेंट, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, औद्योगिक संस्था आदींनी वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे.
गतवर्षी शहरात साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली होती. वृक्ष लावताना त्यांची "जीओ टॅगिंग"द्वारे नोंद करण्यात आली. मनपाच्या शिक्षकांनासुद्धा "टार्गेट" देण्यात आले होते. यापैकी किती वृक्ष जगले, याची प्रत्यक्षात तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. वृक्ष लागवडीची गरज ओळखून सर्वांनी समोर येण्याची गरज आहे. - अजय लहाने, आयुक्त मनपा.