ग्रामविकासाचा कणा मानल्या जाणारे ग्रामसेवक तब्बल १५ दिवसांपासून संपावर गेलेल आहेत. परिणामी गावांना बकालपण आले असून, याचा फटका ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. याबाबत लोकमतने घेतलेला हा वेध..
** ग्रामसेवकांना प्रशासनाने बजाविल्या नोटीस..
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने गावपातळीवर कामाचा खोळंबा झाला आहे. गावपातळीवर कारभार विस्कळीत झाला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने संपकरी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी कर्तव्यावर तातडीने रुजू व्हा अन्यथा महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम १९६४ नुसार योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. कर्तव्यात कसूर केल्याची बाब खपवून घेतली जाणार नाही, याचा उल्लेख कारणे दाखवा नोटीसमध्ये करण्यात आला.
** ग्रामसेवकांच्या अशा आहेत मागण्या..
ग्रामविकास अधिकार्यांना सुधारीत वेतन श्रेणी लागू करावी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकरीता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, १0 ग्रामपंचायतीमागे एक ग्रामविस्तार अधिकारी नेमावा, प्रवास भत्ता तीन हजार रुपये करावा, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, विनाचौकशी निलंबन करण्यात येवू नये, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची एकतर्फी चौकशी व वसुली बंद करावी आदी मागण्या मार्गी लागेपर्यंत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ठोस आश्वासन अजून मिळाले नाही.
** विकासकामांचा बट्टय़ाबोळ
गत पंधरा दिवसापासून विविध मागण्यासाठी ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे विकासकामांचा बट्टय़ाबोळ होत आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प होत आहे. पाऊस लांबल्याने अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामसेवक संपावर असल्याने नियोजन कोलमडले आहे. परिणामी, पाणीटंचाईच्या झळा ग्रामवासियांना घामाघूम करीत आहेत. कामबंद आंदोलनामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. नागरिकांना, विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीतून मिळणार्या दाखल्यांना उशीर होत आहे. त्या दाखल्याअभावी कामे थांबल्या गेली आहेत. गावातील कर वसुलीच थांबली असल्याने विकासाला निधीच मिळत नाही.
** आंदोलनात अडकले विद्यार्थ्यांचे दाखले
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप लागले आहे. जुलै महिना हा शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध कामांसाठी खर्या अर्थाने ह्यहंगामह्ण असतो. शेतकरी व विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत विविध प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांच्या दाखल्याची गरज आहे. शेतकर्यांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजनांची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी ग्रामसेवकांच्या दाखल्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाचा अपवाद वगळता उर्वरीत योजनांसाठी ग्रामसेवकांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे. मात्र, ग्रामसेवक संपावर असल्याने दाखला कसा मिळणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
** गावपातळीवर अशी झाली कामे प्रभावित..
ग्रामसेवक गावात नसल्याने गावपातळीवर कामाचा खोळंबा होत आहे. अनेक गावात पाणी टंचाई आहे. त्यावरील उपाययोजना ठप्प आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, ब्लिचींग पावडर,कृषी विषयक योजना, ऑनलाईन जन्म मृत्युच्या नोंदी, गावपातळीवर खरेदी-विक्रीचे व्यवहार आदी कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. गावातील स्वच्छतेची कामेही प्रभावित झाल्याने घाण निर्माण झाली
** जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांना लागले कुलूप
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप लागले आहे. ह्यलोकमतह्णने चमूने आज केलेल्या पाहणीत गावोगावी घाणीचे साम्राज्य आढळून आले.