विवेक चांदूरकर /अकोलाजिल्ह्यात गावागावांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत वृक्षलागवडीची कामे करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्यावरही झाड काही दिसेनात. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी शाळकरी विद्यार्थ्यांमार्फत करण्याचे ठरविले. या विद्यार्थ्यांनी आपल्या निष्पक्ष अहवालात जिल्ह्यातील ५३ कामांना निरंकचा शेरा दिल्याने ग्रामपंचायतींचे पितळ उघडे पडले आहे. मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत. ही टक्केवारी केवळ ३१.६४ आहे. परिणामी प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून, मग्रारोहयोच्या कामात किती भ्रष्टाचार होतो, हे उघडकीस आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत जिल्ह्यात वृक्षलावगडीची कामे करण्यात आली. मात्र, मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार होतो. या प्रकरणांची तपासणी करणार्या अधिकार्यांनाही ह्यमॅनेजह्ण करण्यात येते. तपासणीनंतरही सत्य बाहेर येत नाही. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी करण्याची जबाबदारी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांवर सोपविली. त्याकरिता जिल्हास्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले. या समितीने रोहयोच्या कामाचे मोजमाप व त्याचा अहवाल तयार करण्याकरिता प्रत्येक गावात दोन विद्यार्थी व एका शिक्षक असे पथक पाठविले. गावात किती कामे झाली व किती झाडे लावण्यात आली, याची माहिती तसेच एक तक्ताही विद्यार्थ्यांकडे देण्यात आला. या तक्त्यानुसार लावण्यात आलेली झाडे व प्रत्यक्ष असलेली झाडे यांची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली. त्याच्याकडून खूप चांगले, निश्चित चांगले, समाधानकारक, असमाधानकारक, निरंक असे वर्गीकरण झाले. जिल्ह्यातील २0७ गावांमध्ये ७८ कामांचा असमाधानकारक, तर ५३ कामांना विद्यार्थ्यांनी निरंकचा शेरा दिला आहे. जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत.
विद्यार्थ्यांच्या अहवालातून ग्रामपंचायतींचे पितळ उघडे
By admin | Updated: October 25, 2014 00:58 IST