अकोला : मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या मागण्या शासनदरबारी मंजूर करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने संघटनेच्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कुठलाही तोडगा निघत नसल्याने राज्य शासनाने मॅग्मोच्या डॉक्टरांना रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतचा कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. डॉक्टरांनी तातडीने सेवा सुरू न केल्यास त्यांना मेस्मा लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांच्या मागण्या शासनदरबारी मंजूर करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर मॅग्मोच्या डॉक्टरांनी डॉक्टर्स डे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांना विविध मागण्या मान्य केल्या; मात्र या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यावर शासन दरबारी चर्चा करण्यात येत नसल्याने तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. तर रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊन कामावर हजर न झाल्यास या डॉक्टरांवर मेस्मा लावण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. यावरून रविवारी यामध्ये तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे स्पष्ट होणार आहे. या आंदोलनात डॉ. प्रमोद रक्षमवार, डॉ. उज्ज्वला पाटील, डॉ. उमाकांत गरड, डॉ. अश्विन पाटील, डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह मॅग्मो संघटनेचे डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत.
‘मॅग्मो’च्या डॉक्टरांना शासनाचा अल्टिमेटम
By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST