लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तालुक्यातील महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनांपैकी एक असलेल्या गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना गत चार दिवसांपासून ठप्प पडली आहे. पंप नादुरुस्त झाल्यामुळे या योजनेवरील गावांपैकी गोपालखेड, नैराट-वैराट आणि धामणा या तीन गावांचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेची दुरवस्था झाल्याचा आरोप सरपंच प्रशांत मोडक यांनी केला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या गोपालखेड योजनेतून परिसरातील आठ ते दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. आधी पूर्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या योजनेमार्फत आता नदी पात्रात खोदण्यात आलेल्या कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात दर दोन दिवसांआड व्यवस्थित पाणीपुरवठा केल्यानंतर आता पावसाळ्यात नदीला पाणी आल्यामुळे नदीचे पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे; परंतु गत चार दिवसांपासून या योजनेचा एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे गोपालखेड, नैराट आणि धामणा या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नदी किंवा इतर ठिकाणाहून पाणी भरावे लागत असल्याचे चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. पंप नादुरुस्त होऊन चार दिवस झाल्यानंतरही तो अद्यापपर्यंत दुरुस्त झाला नाही. वारंवार पंप नादुरुस्त होतो, त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. - प्रशांत मोडक, सरपंच, गोपालखेड.
गोपालखेडचा पाणीपुरवठा बाधित
By admin | Updated: July 6, 2017 01:26 IST