अकोला: चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत गुडधीच्या पुनम रामनारायण कैथवास हिने १७ वर्षाआतील मुलींच्या गटात ५९ किलो वजनगटात विजेतेपद पटकाविले. पुनमची निवड दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.पुनम ही गोरेगाव खुर्द येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्तर स्पर्धेचे आयोजन केले होते. पुनमने स्वर्णीम कामगिरी करीत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. क्रीडा व युवक सेवा संचालयानालय महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक पंकजकुमार (भा.प्र.से.), नागपूर विभाग क्रीडा उपसंचालक विजय सतान, चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांच्या हस्ते स्पर्धास्थळी पुनमचा प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला. पुनमला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट, वडील रामनारायण कैथवास, काका राजकुमार कैथवास, आई किरण कैथवास आणि आजी पार्वताबाई कैथवास यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळेच यश प्राप्त करू शकली असल्याचे पुनमने प्राजंळपणे भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला पुनमकडून आशा असल्याचे तिचे प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांनी सांगितले.
गुडधीच्या पुनमची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: September 28, 2014 00:50 IST