अकोला: शहरातील गाडगे नगरातील घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करून लॉकरमध्ये ठेवलेला २१ हजार ८३० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गाडगे नगरात राहणारे महादेव गणपत टेकाडे (४८) लग्नकार्यासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लॉकर फोडून चोरट्यांनी १६ हजार २८० रुपयांचे शंभर सहा ग्रॅमचे सोन्याचे मनी, पाच हजार ५५० रुपयांचे दोन ग्रॅमचे दोन सोन्याचे डोरले आणि काही रोख असा एकूण २१ हजार ८३० रुपयांचा ऐवज लंपास केला. महादेव टेकाडे सकाळी घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
गाडगे नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
By admin | Updated: May 13, 2017 05:05 IST