अकोला: शहरातील प्रत्येक घर, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच बाजारपेठेतून दररोज १२१ वाहनांच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो. अशा वाहनांवर इंधनाचा मोठा खर्च होत असल्याची बाब लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी ही संपूर्ण वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामांवर महापालिकेच्यावतीने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. प्रत्यक्षात शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुंबलेल्या नाल्या व सर्व्हिस लाईन असे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता व आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचे काम सातत्याने होत आले आहे. दरम्यान, अकोलेकरांनी उघड्यावर कचरा फेकू नये या उद्देशातून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी केली होती. त्यापैकी चार वाहने नादुरुस्त आहेत. संबंधित वाहनांवर आरोग्य दूत म्हणून वाहनचालकांची नियुक्ती केली आहे. घंटागाडीमध्ये कचरा घेऊन जाण्याच्या मोबदल्यात नागरिकांकडून प्रति महिना ३० रुपये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकानदारांकडून २०० रुपये प्रति महिना असे दर लागू केले आहेत. सदरचे शुल्क वाहनचालकांना दिल्या जाते. तसेच नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्यासाठी वाहनचालकांना मनपाकडून प्रति वाहन पाच ते सात लीटर इंधन दिले जाते. या वाहनांसाठी इंधनावर होणारा खर्च लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी ही संपूर्ण वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधनावर कोट्यवधींचा खर्च
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील इंधनापोटी वर्षाकाठी १ कोटी ८२ लाख ९० हजार रुपये खर्च होतात. तसेच वाहनांची दुरुस्तीही मनपालाच करावी लागते. ही सर्व वाहने भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्यावरील चालकांचे मानधन, इंधन खर्च व वाहनाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कंत्राटदाराला करावा लागणार आहे.
मनपा नवीन वाहनांची करणार खरेदी
मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून नवीन २९ वाहनांची खरेदी केली जाणार असून ही वाहनेदेखील कंत्राटदाराच्या ताब्यात दिली जाणार आहेत.