अकोला: जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये चार वर्षांपासून कारावासात असणार्या कैद्याकडे ३0 ग्रॅम गांजा सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३0 वाजता सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कारागृहामध्ये गांजा सापडण्याची ही चौथी घटना आहे, हे विशेष. कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे कर्मचारी रमेश गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी कैद्यांची तपासणी केली. यात भादंवि कलम ४९८, ३0६ नुसार चार वर्षांपासून कारावास भोगत असलेला जळगाव जामोद तालुक्यातील जवखेडा येथील संजय भीमराव गवई याची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने कारागृह शिपायांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १५ ग्रॅम गांजाच्या दोन पुड्या मिळून आल्या. या प्रकरणी कैदी संजय गवईवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे सिद्ध होते. कारागृहातील कर्मचार्यांच्या मदतीशिवाय कारागृहामध्ये अंमली पदार्थ नेणे शक्य नाही. सहा महिन्यांपूर्वी कारागृहातील एका कर्मचार्याला कैद्याकडे गांजा देताना पकडण्यात आले होते आणि त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कारागृहातील कैद्याजवळ सापडला गांजा
By admin | Updated: February 28, 2015 01:46 IST