अकोला : महावितरणच्यावतीने वीज वाचवा, अधिकृत वीज पुरवठा घ्या, अशी जनजागृती करण्यात आली असली, तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणला चांगलाच शॉक दिला आहे. अकोल्यातील २१३ गणेश मंडळांपैकी केवळ ४५ गणेश मंडळांनीच अधिकृत वीज पुरवठा घेतला आहे. राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होणार्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणेश उत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळे मोठय़ा प्रमाणात रोषणाई करतात. सर्व परिसर प्रकाशमय झालेला असतो. त्यामुळे हजारो युनिट विजेचा वापर होतो. त्याकरिता सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याचे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येते. महावितरण याबाबत जनजागृती करण्याकरिता विविध योजनाही राबविते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडण्या घ्याव्यात, याकरिता त्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, त्यानंतरही गणेश मंडळे अधिकृत वीज पुरवठा न घेता अनधिकृत वीज पुरवठा घेतात. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. मात्र, तरीही गणेश मंडळे सरळ तारांवरून किंवा आजूबाजूची दुकाने व घरांमधून विद्युत पुरवठा घेतात. धर्मदाय आयुक्तांकडून जिल्ह्यात २८६ सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे. यापैकी २११ गणेश मंडळे शहरात आहेत. या व्यतिरिक्तही शेकडो गणेश मंडळे स्थापन झाली आहेत. यापैकी केवळ ४५ गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजपुरवठा घेतला आहे. महावितरण या गणेश मंडळांवर कारवाई करेल काय, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.
गणेश मंडळांचा महावितरणलाच ‘शॉक’!
By admin | Updated: September 1, 2014 01:45 IST