अकोला: कौशल्य विकास योजना ही युवकांचे कौशल्य विकसित करण्यासाठी केवळ प्रशिक्षण देणारी योजना असून, या योजनेंतर्गत नोकरीची कोणतीही हमी दिली जात नाही. प्रशिक्षण देणारी संस्था नोकरी मिळवून देण्यासाठी साहाय्य करते, पण त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत कुणी नोकरी लावून देण्यासाठी शुल्क आकारत असेल, तर अशा फसवेगिरीपासून सावध राहावे, असे आवाहन पी.एम. पोर्टलवरून करण्यात आले आहे. या योजनेच्या नावाखाली काही ठगांकडून फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अकोल्यातील युवकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत, कौशल्य विकास विभागाच्या अधिकार्यांनी अशा प्रकारे फसवणूक होत असेल, तर सावध राहण्याचा सल्ला पी.एम. पोर्टलच्या माध्यमातून युवकांना दिला. अकोल्यातील अभय तायडे या युवकाने कौशल्य विकास योजनेची नोकरीसंदर्भातील जाहिरात वाचून दिलेल्या संपर्क क्रमांकावर चौकशी केली असता, त्याला संपूर्ण माहिती पाठविण्यात आली आणि काही दिवसांनी कंपनीत नोकरी लागल्याचे नियुक्तिपत्र त्याला देण्यात आले. पंतप्रधान योजनेच्या नावाखाली गुरगाव येथील कंपनीने ही जाहीरात प्रसिद्ध केली होती. नोकरी देण्यासाठी या कंपनीने जी तत्परता दाखवली, त्यामुळे अभयला शंका आली. कंपनीविषयी संपूर्ण माहिती गोळा केली असता, दिलेल्या पत्त्यावर कोणतीच कंपनी अस्तित्वात नसल्याचे त्याला कळले. त्यामुळे त्याने कंपनीतील व्यक्तींनी फोनवर सांगिल्याप्रमाणे बँक खात्यात रक्कम भरली नाही आणि त्याची फसवणूक टळली. तथापि, अकोल्यासह राज्यभरातील हजारो बेरोजगार युवकांची कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली फसवणूक; पी.एम. पोर्टलने घेतली तक्रारीची दखल
By admin | Updated: April 23, 2016 02:26 IST