अकोला: दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील चित्पावन ब्राह्मण संघाचे स्नेहसंमेलन कोल्हटकर मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालकांच्या स्पर्धांनी सोहळ्यात रंगत आणली. यात रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, सामान्य ज्ञान, उखाणे, वन मिनिट शो, फॅन्सी ड्रेस, गीत गायन व अंताक्षरी स्पर्धा आदींचा समावेश होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डोंबिवली येथील माधवराव घुले उपस्थित होते. त्यांनी चित्पावनांच्या कार्यकर्तृत्वाचा गोषवारा मांडला. चित्पावनांच्या कर्तृत्वाला कोषरूपात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती चित्पावन संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अशोक गोखले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नरसिंह भागवत यांनी केले. यावेळी सार्थक सोमण याने सरस्वती स्तवन सादर केले. त्यानंतर गायक प्रा. अनिरुद्ध खरे व शांभवी खरे यांनी सुगमगीत व नाट्यगीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात सहजीवनाची २५ व ५0 वर्षे पूर्ण करणार्या दाम्पत्यांचा तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. अकोला अर्बन बँकेच्या संचालकपदी नियुक्त झालेले शंतनु जोशी व राजेंद्र जोगळेकर व लेफ्टनंट पदावर नियुक्त झालेले अजिंक्य करंदीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मीनल सोमण यांनी केले.
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण संघाचे स्नेहसंमेलन
By admin | Updated: January 17, 2015 01:23 IST