संदीप वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कगावातील पाणी गावातच मुरावे, शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, जलसंकट दूर व्हावे, या उदात्त हेतूने जलसंधारणाच्या उपचारासाठी दुर्गम आदिवासी गावातील चुलत्या-पुतण्या शेतकऱ्यांनी आपली दहापैकी पाच एकर शेती दान दिली. त्यांच्या दातृत्वाचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीच सर्वकाही असते. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच असतो. पातूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चारमोळी गावात जंगल असल्याने तशी शेती फारच कमी. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांना पिके काढावी लागतात. अशातच गावाने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. गावातील सात लोकांनी या स्पर्धेचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामुळे जलसंधारणासाठी काम करण्यासाठी ते पे्ररित झाले. त्यांनी हीच प्रेरणा इतर लोकांमध्ये जागृत केली. या जागृतीचा परिणाम एवढा झाला, की ग्रामस्थांनी पाषाण फोडून श्रमदान केले. जलसंधारणाचे उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी गावातील सीताराम दगडू खुळे यांनी पाच एकरांपैकी तीन एकर, तर आकाश रामचंद्र खुळे यांनीही पाच एकरांतील दोन एकर जलसंधारणाच्या कामासाठी दान दिली. जलसंधारणाच्या कामासाठी सलग समतल चर, दगडी बांधसह इतर कामांचा समावेश होता. ही कामे झाल्यानंतर शेतीमध्ये पाणी साचणार आहे. त्यामुळे त्या जमिनीवर पीक घेता येता नाही, हे माहिती असूनही दोन्ही शेतकऱ्यांनी आपली शेती दान दिली. त्यांचे दातृत्व खरोखरच मोठे आहे. दुसऱ्यांच्या जमिनीतील एक तास आपल्याकडे खेचण्याचा हव्यास सगळीकडे असल्याचे दिसते; मात्र इतरांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, त्यांना बारमाही पिके घेता यावे, या उदात्त हेतूसाठी आकाश खुळे आणि सीताराम खुळे यांनी आपली जमीन दिली. त्यांनी जमीन दिल्याने इतर शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचा आदर्श घेत गावातील महादेव किसन खुळे यांनीही आपल्या पाच एकरांपैकी एक एकर शेती सलग समतल चर निर्माण करण्यासाठी दिली आहे.पाणीटंचाई दूर होण्यासाठी दिली जमीन गावातील पाणी प्रश्न सुटावा, शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही जमीन दान दिली आहे. जलसंधारणाची कामे झाल्यामुळे गुरांनाही पाणी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढेल. तूर पिकासाठी जी पाणीटंचाई भासत होती, ती आता दूर होणार आहे. माती नाला बांधातील पाणी शेतकरी आपल्या तुरीच्या पिकासाठी वापरतील, असे सीताराम दगडू खुळे यांनी सांगितले.बांधाची निर्मिती दान मिळालेल्या जमिनीवर ग्रामस्थांनी अखंड परिश्रम करून दोन एकरांवर दगडी बांधांची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच तीन एकरांवर सलग समतल चरही निर्माण करण्यात आले आहेत. महादेव खुळे यांच्या शेतातही सलग समतल चरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी साठविल्या जाणार आहे.
चारमोळीच्या शेतकऱ्यांचे असेही दातृत्व!
By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST