संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीमधील चार नामांकित उद्योजकांनी हुंडीचिठ्ठीचे १५ कोटी अचानक रोखल्याने अकोल्यातील बाजारपेठ हादरली आहे. या प्रकारामुळे शहरातील सात हुंडीचिठ्ठी दलालांसह गुंतवणूदारांचा जीव टांगणीला लागला आहे. अकोल्यातील डाळ आणि तेल उद्योगाचा राज्य आणि राज्याबाहेरदेखील दबदबा आहे. दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल अकोल्यातून होते. या उद्योगावर अनेक जोड व्यवसाय आणि हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र शासनाच्या धोरणापायी यंदा तूर, ढेप, हरभरा आणि सोयाबीनचे भाव कमालीचे पडलेत. त्याचा परिणाम अकोल्यातील डाळ आणि ढेप उद्योगावरही मोठ्या प्रमाणात पडला. हुंडीचिठ्ठी दलालांकडून शेकडा दीड-दोन टक्के व्याजाने रकमा घेऊन एमआयडीसीतील उद्योजकांनी गुंतवणूक केली होती. तूर, ढेप, हरभरा आणि सोयाबीनचे भाव कमालीचे पडल्याने चार उद्योजकांना आता कोट्यवधींची रक्कम फिरविणे कठीण झाले आहे. त्यामुळे एमआयडीसीतील चार उद्योजकांनी १५ कोटी रुपयांची हुंडीचिठ्ठीची रक्कम रोखली. आधीच मंदी असलेल्या बाजारात कोट्यवधींची रक्कम अचानक थांबल्याने ही बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे. शहरातील सात हुंडीचिठ्ठी दलालांना रक्कम न मिळाल्याने दलालांसह ‘झीरो’ची गुंतवणूक करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गुंतवणूदारांमध्ये अकोल्यातील अनेक डॉक्टर, वकील आणि कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे. रक्कम झीरोची असल्याने याप्रकरणी पोलीस किंवा न्यायालयातही तक्रार करणे कठीण आहे. त्यामुळे दलाल आणि गुंतवणूकदारांनी आता उद्योजकांकडून रकमा मिळविण्यासाठी विविध युक्त्या सुरू केल्या आहेत.हॉटेल व्यावसायिकाने डुप्लेक्सचा केला उताराअडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी रक्कम रोखली असली, तरी ती रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे दलाल आणि गुंतवणूकदारांच्या समन्वयाने विषय हाताळला जात आहे. गुंतवणूदारांच्या एका समूहाच्या संमतीने शहरातील नव्याने बांधलेल्या काही डुप्लेक्सचा उतारा एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या नावे करून घेतला आहे.तूर ४५०० वरून ३००० वर, ढेप २४०० वरून १६०० वर, हरभरा ६००० वरून ५२०० वर आणि सोयाबीन १८०० वरून १३०० वर आल्याने शेतकऱ्यांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान, शासनाने मोठ्या प्रमाणात डाळ आयात केली असून, निर्यातीवर प्रतिबंध घातले आहे. त्याचा जबर फटका अकोल्यातील परंपरागत डाळ आणि ढेप उद्योगावर पडला असून, चार उद्योजकांच्या माध्यमातून धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
चार उद्योजकांनी रोखले १५ कोटी
By admin | Updated: June 13, 2017 00:38 IST