हनुमान जगताप ./मलकापूर : विवाह सोहळा आयोजित करण्यापूर्वीच मुहूर्त काढला काढला. तारीख आणि वेळेनुसार हा मुहूर्त सर्वांसाठी उत्सुकता आणि उत्कंठा वाढविणारा असतो. मात्र, शहरांसह ग्रामीण भागांत मुहूर्तावर विवाह लावले जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच विवाह नियोजित वेळेतच व्हावे, यासाठी लेवी पाटीदार समाजाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार विवाह मुहूर्तावर अर्थात वेळेवर न लावले गेल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वदूर लग्न समारंभ सुरू आहेत. मात्र त्यात मुहूर्ताची पर्वा कुणालाही नाही असे बर्याच ठिकाणी दिसते. त्यात पाहुण्यांची परवड न सांगण्यासारखीच, अशा परिस्थितीवर मात करणारी अभिनव परंपरा मलकापूर येथील भ्रातृमंडळातर्फे चार वर्षांपासून राबविली जात आहे. विवाहास विलंब झाल्यास ५ हजाराचा दंड आकारण्यात येत असून, त्याला समाजाची मान्यता मिळाली आहे. स्थानिक लेवा पाटीदार समाजाच्या भ्रातृमंडळाने त्यांच्या अखत्यारीतील विवाह सोहळ्यासाठी काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. अर्थात महाराष्ट्र राज्य लेवा पाटीदार महासंघाच्या तशा सूचना आहेत. त्यानुसारच गेली तीन ते चार वर्षे अंमलबजावणी सुध्दा होत आहे. चुकीच्या चालीरितींना आळा बसावा, विवाह समारंभ चांगल्या पध्दतीने पार पडावे हा त्या मागील उद्देश असल्याची प्रतिक्रिया स्थानिक भ्रातृमंडळाचे सचिव एस.टी. पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. भ्रातृमंडळाच्या अखत्यारीत होणार्या विवाह सोहळ्यात निर्धारीत राशी आकारली जाते. मात्र लग्न समारंभ ठरल्या मुहूर्तावर न झाल्यास संबंधितांना ५ हजाराच्या दंडाची तरतूद केलेली आहे. या निर्णयाला संपूर्ण लेवा पाटीदार समाजाची मान्यता असून, दंड आकारणी करताना समाजातील गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नाही हे विशेष ! दरम्यान, ५ हजारांचा दंड ही बाब सहज वाटत असली तरी आमची विनाकारण बदनामी होऊ नये समाजात प्रतिष्ठेला ठेच लागू नये या भितीपोटी स्थानिय भ्रातृमंडळात विवाह समारंभ वेळेवरच लागत असल्याची परंपरा गेली चार वर्षापासून जोपासली जात असून लेवा समाजाचा त्यात सहभाग आणि पाठींबा आदर्श घेण्यासारखा असाच आहे.
विवाहाचा मुहूर्त टळल्यास पाच हजारांचा दंड!
By admin | Updated: May 11, 2015 02:09 IST