मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मेडशी तपासणी नाक्यावर एस.टी. बसच्या तपासणीदरम्यान ५ संशयित बांग्लादेशी युवकांना धारदार शस्त्रासह रविवारी ताब्यात घेण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर या घटनेने खळबळ उडाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहीम पोलिस प्रशासनाच्यावतीने चौफेर तपासणी मोहिम सुरु आहे. दरम्यान, मेडशी तपासणी नाक्यावर पोलिसांनी मलकापूरहून अहमदपूरला जाणारी एम. एच. ४0 वाय ५७२२ क्रमांकाच्या एस.टी. बसची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना बेवारस बॅग आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता, सर्वच प्रवाशांनी ती आपली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून एका युवकास ताब्यात घेतले. त्यावेळी कंडक्टरने त्याच्यासोबत आणखी पाच जण असल्याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी बॅग तपासली असता, त्यामध्ये ५ धारदार शस्त्रं आढळली. पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरु केली असता, त्यांच्यापैकी एक युवक पळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. आरोपींची नावं मो. शोगुर मो. यारीफ, मो. सैफुल मो. अनार, मो. अहेदल नुर मोहम्मद, मो. सघान मो.सुलतान, मो. मिंदू फजल आणि मो. फैजली रहमान असून, ते बांग्लादेशातील जशोर जिल्ह्यातील धम्मपोल तालुक्यातील रघुनाथपूर येथील रहिवासी आहेत. पोलिस या आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. आरोपी भारतात कशासाठी आले, त्यांचा म्होरक्या कोण, आदी माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलिस कॉन्स्टेबल संतोष इढोळे, अजय महल्ले, रामभाऊ खोडके, संतोष अवघडे यांनी केली आहे.
पाच बांग्लादेशी युवक शस्त्रसाठय़ासह पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: October 6, 2014 00:56 IST