अमोल जायभाये/ खामगावमागील पाच वर्षात विदर्भात पेरण्या २२ जूनपूर्वी झाल्या आहेत; मात्र यावर्षी पहिल्यांदाच २४ जून उजाडला तरी सुद्धा पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे सर्वच चिंताग्रस्त आहेत. पावसाअभावी पेरणी रखडली आहे. वर्धा जिल्हा वगळता कुठेही पाऊस नाही. वर्धात झालेला पाऊसही मान्सूनपूर्व झाला आहे. मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता २00९ साली विदर्भात अत्यंत कमी पाऊस पडला आहे; मात्र पेरणी २२ जूनला सुरु झाली होती. इतर वर्षी मान्सूनची कृपादृष्टी विदर्भावर चांगली आहे. २0११ मध्ये विदर्भात अतिशय चांगला पाऊस पडला होता. तर गत वर्षी पावसाने मागील ९९ वर्षाचे रेकॉर्ड तोडले होते. यावर्षी २४ जून उलटला तरीही पाऊस येत नसल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. खत, बियाणे घरात आणून ठेवली आहेत. शेतीची पेरणीपूर्व कामेही झालेली आहेत. काही शेतकर्यांनी ठिबक सिंचनवर कपाशी लावलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून सक्रिय झाला आहे; मात्र अद्याप पाऊस पडला नाही. २00९ मध्ये पाऊस कमी; परंतु पिकांसाठी पोषक पडला होता, त्यामुळे बळीराजा सुखी होता. मागील वर्षी पाऊस मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे ओला दुष्काळ पडला होता. दुसरे पीकही अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे गेले, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यावर्षी अद्याप पाऊस न पडल्यामुळे त्याची चिंता अजून वाढली आहे. पाच वर्षाची आकडेवारी पाहिली तर २00९ मध्ये पाऊस कमी, २0१0 मध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. तर २0११ मध्येही साधारण पावसाने सरासरी पूर्ण केली होती. २0१२ मध्ये पाऊस कमी झाला होता. तर मागील वर्षी खूप पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी पाऊस कमी होणार असल्याचे अंदाज सगळ्य़ांनीच दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र मान्सून विदर्भावर कृपा करतो की अवकृपा, हे येणारे चार महिनेच सांगतील. सध्यातरी पेरणीलायक पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी लांबत आहे. मान्सून सक्रिय झाल्याच्या बातम्या येत आहेत; मात्र तो कधी पडणार, याकडे आता शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
पाच वर्षात मान्सून पहिल्यांदाच उशिरा
By admin | Updated: June 25, 2014 00:01 IST