विवेक चांदूरकर / अकोला:केवळ समुद्र किनार्यावरच आढळणारा, युरोपीय देशातून स्थलांतरीत दुर्मिळ ग्रे प्लवर पक्षी विदर्भात प्रथमच निदर्शनास आला आहे. यासोबतच ज्ॉक स्नाईप व डनलीन या दुर्मिळ पक्ष्यांच्याही नोंदी विदर्भात वाईल्डलाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटीच्या (वेक्स) अभ्यासकांनी रविवारी पक्षी निरक्षणादरम्यान घेतल्या आहेत.वाईल्डलाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझरर्व्हेशन सोसायटी (वेक्स) सध्या संपूर्ण विदर्भात स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करून, त्यांच्या नोंदी करीत आहे. हिवाळी पाणपक्षी अभ्यासादरम्यान अकोला परिसरामध्ये ग्रे प्लवर व ज्ॉक स्नाईप या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे व निनाद अभंग यांनी घेतल्या आहेत. हे पक्षी सध्या शहरालगतच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर व दगडपारवा तलावावर वास्तव्यास आले आहेत. ग्रे प्लवर या पक्ष्याचे शास्त्रीय नाव प्लूवीएलीस स्क्वाटारोला असून, चिखलपक्षी अर्थात वेडर्स प्रकारातील हा पक्षी हिवाळ्यात युरोपमधून स्थलांतर करून भारताच्या समुद्र किनार्यावर व बेटांवर येतो. भारताच्या भुभागावर या पक्ष्याच्या नोंदी क्वचितच मोठय़ा नद्यांवर होत असतात. या पक्ष्याला गोल्डन प्लवरपासून वेगळा ओळखणे कठीण असून, तासनतास निरीक्षण व त्याच्या सवयीवरून दगडपारवा तलावावर त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. हा पक्षी महाराष्ट्राच्या समुद्र किनार्यावर स्थलांतर करून दरवर्षी येतो; परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झाली नसल्याने यावेळी झालेली नोंद ही विदर्भातील पहिलीच असल्याची माहिती वेक्सचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. ज्ॉक स्नाईप हा एक छोटासा, पाणवनस्पतींमध्ये राहणारा व इतर स्नाईप पक्षांपासून वेगळी ओळख असलेला आणखी एक दुर्मिळ पक्षी आहे. आकाराने इतर स्नाईपपेक्षा छोटा व आखूड चोच आदींवरून या पक्ष्याला ओळखावे लागते.
ग्रे प्लवरची विदर्भात प्रथमच नोंद
By admin | Updated: February 4, 2015 01:46 IST