अकोला : बाराशे वर्षांपूर्वी एक युगपुरुष या भारतभूमीत जन्माला आला. ती व्यक्ती म्हणजे साक्षात आदि शंकराचार्य. राष्ट्रनिर्मितीचं कार्य करीत असताना, त्यांनी केवळ व्यक्ती नाही, तर संपूर्ण समाज बदलण्याकरिता एक आधार म्हणून धर्म दिला. धर्म म्हणजे केवळ पोथी-पुराण किंवा पूजा-अर्चा करणे नव्हे. धर्म हा केवळ एक व्यक्ती किंवा समाजापुरता र्मयादित नाही, तर धर्म हा आचार-विचार आणि समाजाला उन्नतीकडे नेणारा असल्याने आधी आपण स्वत:ला बदलायला हवे. समाजाला जर देवत्वापर्यंत न्यायचे असेल, तर आधी स्वत:तील पशुत्व नष्ट करायला हवं. उत्तुंग समाज निर्माण करायचा असेल, तर स्वत:तील पशू नष्ट व्हायला हवा, असे प्रतिपादन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार, २३ एप्रिल रोजी आयोजित आदि शंकराचार्य जयंती महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. सनातन वैदिक तत्त्वज्ञानाच्या आचरणातून आजच्या पाश्चात्त्य भोगवादी जीवनपद्धतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा. तेव्हाच कुठले जगद्गुरू आदि शंकराचार्यांना अपेक्षीत असलेल्या सशक्त आणि सर्मथ राष्ट्राची निर्मिती होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे गरजे असल्याने या कार्यात पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, शारदानंद महाराज, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, माजी आमदार विजयराव जाधव, कार्याध्यक्ष नाना कुळकर्णी व संयोजक राजू बियाणी, प्राचार्य एस. डी. देशमुख व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. संचालन प्राचार्य अतुल बकाल व प्राची पिंपरकर यांनी केले. आभार छाया देशमुख यांनी मानले. मदनलालजी खंडेलवाल व गोपाल खंडेलवाल यांच्या प्रमुख नेतृत्वात पार पडलेल्या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते.
उत्तुंग समाजनिर्मितीकरिता आधी स्वत:ला बदलायला हवे- स्वरूपानंद सरस्वती
By admin | Updated: April 24, 2015 02:09 IST