अकोला : स्थानिक सवरेपचारमध्ये उपचारार्थ दाखल अर्पणा क्षीरसागर यांच्यावर उपचार करण्यात अक्षम्य हलगर्जी दाखविल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या मो. राजीक मो. कासीफ या डॉक्टरला अखेर गुरुवारी सेवामुक्त करण्यात आले. या प्रकरणी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचे अध्ययन केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ही कारवाई केली आहे. 'लोकमत'ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते. त्याची दखल घेऊन ही कारवाई झाली आहे.जुने शहरातील बाळापूर रोड भागातील पार्वतीनगरस्थित किरण क्षीरसागर यांच्या पत्नी अर्पणा क्षीरसागर (३५) यांना गत गुरुवारी, १४ जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजता सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु कक्षात कार्यरत डॉक्टरांची हलगर्जी व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तीन तासांतच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप किरण क्षीरसागर यांनी केला होता. तसेच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चिकित्सा अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, महिला रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉ. अर्पणा वाहने व सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली. त्यानंतर या समितीत न्यायवैद्यकशास्त्र व शरीरविकृतीशास्त्र विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांचा समावेश होऊन ही समिती सात सदस्यीय झाली होती. या समितीने घडामोडीशी संबंधित डॉक्टर व इतरांचे जबाब नोंदविले व याबाबतचा अहवाल गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना सोपविला. अधिष्ठातांनी या अहवालाच्या आधारे दोषी आढळून आलेले औषधनिर्माणशास्त्र विभागाचे कनिष्ठ निवासी डॉक्टर मो. राजीक मो. कासीफ यांना सेवामुक्त करण्याचा आदेश दिला.
अखेर दोषी डॉक्टर सेवामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:21 IST