बाश्रीटाकळी : येथील गुलामनबी आझाद महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मधुकर पवार यांच्याविरुद्ध स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकासोबत बाचाबाची केल्याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर पवार हे शुक्रवार, १८ जुलै रोजी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले. तेथे त्यांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिटची ५ लाख रुपयांची रक्कम काढावयाची असल्याचे बँक व्यवस्थापक संदेश काशीराम पांढरे यांना सांगितले. त्यावेळी बँक व्यवस्थापकांनी पैसे काढण्यासाठी संस्थेचा ठराव आवश्यक असल्याचे व विद्यापीठाची परवानगी आणल्यानंतर नियमानुसार दोन लाख रुपये काढल्या जाऊ शकतात, असे पवार यांना सांगितले. बँक व्यवस्थापकाने पैसे देण्यास असर्मथता दर्शविल्यानंतर पवार यांचा पारा चढला व त्यांनी सर्वांसमोर बँक व्यवस्थापकास शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली व त्यांच्या टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. तसेच त्यांना मारहाण करण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी बँक व्यवस्थापक पांढरे यांनी बाश्रीटाकळी पोलिसांत तक्रार नोंदविली. पांढरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्य पवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. शेर अली, भटकर, सुनील घुसडे तपास करीत आहेत.
मधुकर पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: July 19, 2014 01:32 IST