लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दुधाळ जनावरे वाटप योजनेतील लाभार्थींना म्हशी देण्याऐवजी मोठी रक्कम कापून काही रक्कम देण्यात आली. हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दिलेल्या भेटीत लाभार्थींनी उघड केला. त्यामुळे हा संगनमताने भ्रष्टाचार असून, पशुधन विकास अधिकारी दिलीप देशमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करा, या मागणीचे पत्र कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. अनुसूचित जाती, जमातींसाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजना राबवली जाते. ती राबवताना पशुसंवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, असा आरोप सभापती गावंडे यांनी आधीच दिलेल्या तक्रारीत केला. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडून २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांतील लाभार्थींची यादीही मागवली. त्यामध्ये नमूद लाभार्थींकडे भेटी देऊन त्यातील सत्यता पडताळणी करण्यासाठी बुधवारी त्यांनी मूर्तिजापूर पंचायत समितीमधील गावांना भेट दिली. त्यावेळी निंबा गावातील चार लाभार्थींनी म्हैस खरेदी न करता पशुधन विकास अधिकाऱ्यांनी पैसे दिल्याचे सांगितले, असे निवेदनात गावंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल आणि फसवणूक झाल्याने पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी दिलीप देशमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. कृषी अधिकारी तिजारे यांच्या चौकशीचीही मागणीशासनाच्या विशेष घटक योजनेतून बैलजोडी आणि बैलगाडी लाभार्थींचीही भेट घेण्यात आली. त्यामध्ये लाभार्थींनी बैल विकत घेतले नाहीत. त्यांना पैसे देण्यात आल्याचे सांगितले. लाभ मिळण्यासाठी कृषी अधिकारी तिजारे यांनी लाभार्थींकडून रक्कम उकळल्याचा आरोपही सभापती गावंडे यांनी केला. त्यांच्यावर चौकशी करून कारवाईची मागणीही त्यांनी केली.
पशुधन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा!
By admin | Updated: May 26, 2017 03:05 IST