आकोट: मंगळवारी मध्यरात्री आकोट तालुक्यात आलेल्या वादळी वार्यासह बरसलेल्या पावसाने फळबागांसह रब्बी पिकांना फटका दिला. उमरा व पणज सर्कलमधील हजारो हेक्टर जमिनीवरील १0 कोटी रुपयांचा संत्रा जमिनीवर पडला असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. या भागातील गहू, केळी, मका, डाळिंबाचे पिक मातीमोल झाले आहेत. तालुक्यात रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून, विद्युत तारा व खांबसुद्धा पडल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे, छपरे उडून गेली आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरितपट्टय़ात मोठय़ा प्रमाणात रब्बी पिकांची लागवड आहे. या भागात गहू, संत्रा व केळी आदी पिकांचा हजारो हेक्टरवर पेरा आहे. वादळामुळे बहरलेला कोट्यवधी रुपयांचा संत्रा जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. गहू अक्षरश: झोपल्याने मातीमोल झाला आहे. आंब्याचा फुलोरही गळून पडला आहे. विद्युत तारा तुटल्याने उशिरा रात्रीपर्यंत वीज पुरवठा बंद होता. ५00 हेक्टरच्यावर संत्र्याचे तर ३00 हेक्टरच्यावर केळीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या वादळामुळे संत्रा व केळी उत्पादकांचा व बागायतदार शेतकर्यांच्या तोंडचा घास पळविला गेला आहे. नुकसानीच्या संदर्भात संत्रा उत्पादक शेतकर्यांनी महसूल विभागाला निवेदन सादर केले आहे.
शेतकरी हवालदिल; गहू, हरभरा, केळी जमीनदोस्त
By admin | Updated: February 12, 2015 01:14 IST