अकोला : मोटारसायकल, कारची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येसोबत वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून घेण्याची क्रेझ प्रचंड वाढली. ह्यलोकमतह्णने शुक्रवारी शहरातील शंभर वाहनधारकांचे सर्वेक्षण करून त्यांचे फॅन्सी नंबर प्लेटबाबत मत जाणून घेतले. सर्वेक्षणादरम्यान शंभरपैकी ८६ वाहनधारकांनी फॅन्सी नंबर प्लेटला पसंती दर्शविल्याची गंभीर बाब समोर आली. रस्त्यांवरून धावणार्या गाड्यांना असलेले स्पेशल नंबर नेहमीच दिसून येतात. या स्पेशल नंबरवाल्या गाडीवर फिरणारी व्यक्तीही स्पेशलच असणार, असेही आपल्याला वाटते. स्पेशल नंबर घेऊन हे उँचे लोग, त्यांची उँची पसंद जोपासताना दिसतात. त्यासाठी वाहतूक नियम पायदळी तुडविली जातात. स्पेशल नंबर घेऊन त्याला फॅन्सी टच देणार्यांची संख्या अलीकडे भलतीच वाढली आहे. फॅन्सी नंबरप्लेटविषयी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही, त्याकडे कानाडोळा करीत वाहनधारक नियमाप्रमाणे नंबर प्लेट तयार न करता, फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर बसवितात. वाहतूक नियमांचा, कायद्याचा भंग होत असल्याचे माहीत असून, हजारो मोटारसायकलस्वार, कारमालक फॅन्सी नंबर प्लेट बसवितात. फॅन्सी नंबर प्लेटवर कायद्याने बंदी आणली, तरी त्याचा विशेष फरक पडणार नसल्याचे ५५ टक्के वाहनचालकांना वाटते. फॅन्सी नंबर प्लेट स्वत:हून काढण्याविषयी विचारले असता, वाहनचालकांनी, अनेकजण कायद्याचे उल्लंघन करतात. त्यांचेवर वाहतूक पोलीसही कारवाई करीत नाहीत. मग, आम्हीच का फॅन्सी नंबर प्लेट काढावी? असा प्रश्न केला. वाहतूक नियंत्रण शाखेने दंड वाढविल्यानंतर फॅन्सी नंबर प्लेट काढणार का? असा प्रश्न केल्यावर, वाहनचालकांनी दंड वाढविल्यानंतरही फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
युवकांसह ज्येष्ठांनाही फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ
By admin | Updated: February 14, 2015 01:18 IST