पातूर (जि.): चंद्रपूर येथील एका हिंदू मुलीच्या नावावर सिमकार्ड खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीस मोबाइल गॅलरी संचालकाच्या सतर्कतेमुळे गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पातूर येथील संभाजी चौकात असलेल्या सिदाजी महाराज मोबाइल गॅलरीमध्ये सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास बोगस दस्तऐवज देऊन सिमकार्ड खरेदीचा प्रयत्न झाला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या वाडी रायतळा येथील रहिवासी शेख रहेमान शे. करीमने चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीच्या आधारकार्डावर सिमकार्ड विकत घेण्याचा प्रयत्न केला. मोबाइल गॅलरीचे संचालक अक्षय निमकंडे यांच्याकडे याच आधार कार्डद्वारे २९ मार्च रोजी सिमकार्ड खरेदी करण्यात आले होते. मोबाइल संचालकांना याबाबत शंका आल्याने त्यांनी सिमकार्ड सुरू केले नाही. गुरुवारी पुन्हा याच दस्तऐवजाच्या आधारावर शेख रहेमानने सिमकार्ड खरेदी करण्याचा प्रयत्न केला. ही बाब निमकंडे यांच्या लक्षात आली. हिंदू मुलीच्या नावावर सिमकार्ड खरेदी केले जात असल्याने त्यांनी शेख रहेमानला त्याचे ओळखपत्र मागितले. त्याने ओळखपत्र न देता आपला डाव फसल्याचे बघून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निमकंडे आणि तेथे उपस्थिती चार ते पाच जणांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख रहेमानने सिमकार्ड खरेदीबाबत पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याने पातुरात ज्या व्यक्तींना ओळखतो, असे पोलिसांना सांगितले, त्या व्यक्तींनी शेख रहेमानला ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१ आणि ७४ नुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनिल जुमळे पुढील तपास करीत आहेत.
बनावट दस्तऐवजाद्वारे सिमकार्ड खरेदीचा प्रयत्न फसला!
By admin | Updated: April 1, 2016 00:51 IST