विवेक चांदूरकर/अकोलागत आठ दिवसांपासून थंडी जाणवत असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या प्रारंभापासून देश-विदेशातून भारतात स्थलांतर करून येणारे पाहुणे पक्षी परिसरातील जंगलामध्ये व पाणवठय़ावर दिसू लागतात. यामध्ये युरोपमधून व उत्तरेकडील मंगोलिया, सायबेरिया, रशिया, चीन, तिबेट आदी देशांमधून येणारे बदक, दलदलीतील वेडर्स यांची संख्या मोठी असते. सध्या पाणवठय़ांवर येणारे बदक व करकोचे हे पक्षी अजून पोहोचले नसले तरी काही वेडर्स व जंगलात येणारे छोटे पक्षी यांचे आगमन झाले आहे. आपल्या भागात स्थलांतराचा काळ न घालविणारा व फक्त प्रवासादरम्यान दिसणारा युरो पीयन रोलर सध्या अकोला परिसर व विदर्भामध्ये तात्पुरता निवार्यासाठी थांबलेला आहे. हिमालयातून युरोप व द. आफ्रिकेमध्ये विणीसाठी स्थलांतर करून जाणारा हा पक्षी यावेळी तेथून मोठे झालेल्या पिल्लांना घेऊन हिमालयाकडे परतीच्या प्रवासास निघतो व ऑ क्टोबरदरम्यान काही काळ तो विदर्भामध्ये आढळून येतो. अमरावतीची वाईल्ड लाईफ अँन्ड एन्व्हायर्नमेंट कंझर्वेशन सोसायटी (डब्ल्यूईसीएस/वेक्स) ही संस्था विदर्भातील पक्ष्यांचा अभ्यास करीत असून, या अंतर्गत संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार, किरण मोरे व निनाद अभंग यांनी अकोला परिसरामध्ये त्यांना एकूण १६ युरोपीन रोलर आढळून आले. या पैकी १२ पक्षी हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात निदर्शनास पडले. या शिवाय सँडपायपर, रेड शांक, ग्रीन शांक मागील वर्षी प्रथमच नोंद केलेला रफ, रेड स्टार्ट, रेड थ्रोटेड, फ्लायकॅचर आदींचेही आगमन झाल्याचे दिसून आले आहे. बदक, करकोचे, कौच आदी प्रकारातील पक्ष्यांचे लवकरच आगमन होणार असल्याची माहिती वेक्सचे सचिव डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. संस्थेचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार अकोला परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी घेत आहेत. युरोपीयन रोलर हा पक्षी आणखी आठ दिवस राहण्याची शक्यता आहे.
युरोपीयन रोलर पक्ष्यांचा अकोला परिसरात मुक्काम
By admin | Updated: October 27, 2014 01:18 IST