लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आयुष्य खूप सुंदर आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो. लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी कमी खा आणि खूप जगा, असा मोलाचा सल्ला रविवारी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लठ्ठपणा - मधुमेह एक नवा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. चौधरी यांनी उपरोक्त सल्ला दिला. यावेळी मंचावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, महाराष्ट्र बहुजन संघाचे प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, आयएमएचे सचिव डॉ. रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या एक तासाच्या व्याख्यानात डॉ. नानासाहेबांनी माणसाच्या जगण्याच्या चुकीच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. वारंवार एखादा रुग्ण आपल्याकडे यावा, असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही. काही औषध कंपन्या आणि अन्न कंपन्यांच्या बदमाशांमुळे रुग्णांना चुकीचे सल्ले दिले जातात, त्यासाठी आता प्रत्येकाने जागरुक होण्याची गरज आहे. आपल्या शरीराला ज्या घटकांची गरज असते, ते घटक किती प्रमाणात हवेत, त्यासाठी काय खायला हवे, याबद्दलची माहिती प्रत्येकाने जाणून घ्यायला हवी. लठ्ठपणा वाढला, की त्यातून अनेक आजार जन्म घेतात. शरीरातील साखर न जळल्याने तिचे रूपांतर चरबीत होते. ही चरबी सातत्याने वाढत गेल्याने लठ्ठपणाची समस्या वाढते. एखाद्याचे शरीर बाहेरून जेवढे लठ्ठ दिसते तेवढीच ती समस्या आतपयर्ंत शिरलेली असते. लठ्ठपणा कमी करायचा असेल, तो टाळायचा असेल, तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त साखरेचा वापर होण्याबरोबरच साखर आपल्या शरीरात जाणारच नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले. व्याख्यानासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
गव्हातील सत्त्व झाले कमीपूर्वीच्या काळी गव्हामध्ये जे सत्त्व होते, ते आता राहिलेले नाही. उत्पादन वाढविण्याच्या नादात या गव्हातील सत्त्व कमी झाले असून, त्यातील काबरेहायड्रेटचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. हे काबरेहायड्रेट शरीरासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादा आजार जडला, की आता आपण दुरुस्तच होऊ शकत नाही, असे न समजता नव्या उमेदीने कामाला लागा, असे ते म्हणाले.