अकोला : यावर्षी पावसाळा अत्यल्प झाला असल्याने खरीप हंगामात शेतकर्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात मरणासन्न वातावरण आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे पोळा सणावर विरजण पडले आहे. बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याने बाजारपेठ सजली असली; तरी शेतकर्यांची गर्दी दिसत नाही. २५ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, बैलांना सजविण्यासाठी लागणार्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. शहरातील गांधी चौक परिसरातील दुकानांमध्ये बैलांच्या गळ्यात घंटी व पट्टा, नाथा, रोठे, दोर, हार, झुला, रंग, चराटं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांकडे शेतकरी फिरकताना दिसत नाही. जिल्ह्यात सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसल्याने अध्र्या अधिक शेतकर्यांनी पेरणीच केली नाही, तर ज्या शेतकर्यांनी पेरणी केली त्यांची पेरणी उलटली. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे ग्रामीण भागात निराशाजनक वातावरण आहे. याचा सरळ परिणाम पोळा सणावर पडला आहे. बैलांना सजविण्यासाठी तसेच रंगरंगोटी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दुकानांमध्ये गर्दी करतात. यावर्षी ग्रामीण भागात निराशाजनक वातावरण असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसत नाही.
पोळ्यावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: August 21, 2014 00:55 IST