अकोला : भारतरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठराविक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अकोट फैल, भीम नगर, जठार पेठ चौकातील कार्यकर्त्यांनी चौकांचौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठमोठ्या प्रतिमा लावून वंदन केले. अशोक वाटिका परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु, कोरोनामुळे अनेकांनी अशोक वाटिकेच्या प्रवेशद्वाराजवळूनच बाबासाहेबांना वंदन केले. सकाळी ११ वाजल्यानंतर अशोक वाटिकेतील प्रवेशद्वार उघडण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी वाटिकेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह क्रांतिसूर्य महात्मा फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत भीम जयंती साजरी केली. दरवर्षी मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात येते. तसेच ठिकठिकाणी अन्नदान, विद्युत रोषणाई, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, कोरोनामुळे सर्वच उत्सव मर्यादित झाले आहेत. अशोक वाटिका परिसराला तर जत्रेचे स्वरूप येते. परंतु, यावेळी अशोक वाटिका परिसरात शांतता होती. शहरातील काही ठिकाणी मोजकेच कार्यक्रम पार पडले. नागरिकांनी घरामध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
फोटो: