Akola Double Murder Case: आशिष गावंडे, अकोला: घरगुती वाद विकाेपाला गेल्यामुळे क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी अकोल्यातील तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिसांनी आराेपी पतीला अटक केली आहे. सुरज गणवीर (३७, रा. सिद्धार्थ नगर, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याने पत्नी अश्विनी (२८) व मुलगी आराेही (३) यांची गळा दाबून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही सूरज याची दुसरी पत्नी हाेती. अश्विनीला पहिल्या पतीपासून आराेही ही मुलगी हाेती. मागील काही दिवसांपासून या दाेघांमध्ये सतत घरगुती वाद हाेऊन भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी आराेपी सूरज हा जेवण करण्यासाठी घरी आला हाेता. ताे जेवण करत असतानाच अश्विनीने वादाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने सुरजने प्रथम पत्नीचा दुपट्टयाने गळा दाबून खून केला व त्यानंतर त्याच पद्धतीने तीन वर्षीय सावत्र मुलीचाही गळा दाबून जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच रामदासपेठ पाेलिस स्टेशनचे प्रभारी पाेलिस निरीक्षक अरुण परदेशी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. रामदासपेठ पोलिसांनी आरोपी सुरज गणवीर याला अटक केली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
- आराेपीने पाेलिसांना दिली माहिती- पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर आराेपी सुरजने रामदासपेठ पाेलिसांना खून केल्याची माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठले असता आराेपी घरी बसून हाेता. पत्नी अश्विनी सुरजसाेबत विविध मुद्यांवरुन नेहमी वाद घालत असायची अशी माहिती पाेलिसांनी दिली.
- मुलांना सावत्र वागणूक- अश्विनीसोबत लग्न झाल्यानंतरही, सूरजची पहिल्या पत्नीपासूनची मुले त्याच्या घरी येत असत. तेव्हा अश्विनी त्यांच्याशी तुसडेपणाने वागत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, अश्विनीवर जवळपास एक लाख रुपयांचे कर्ज होते, जे सूरजने स्वतःच्या खर्चाने फेडले होते. तरीदेखील त्यांच्यातील वाद आणि तणाव कायम हाेता. मुलांना अश्विनीकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याने सूरज तणावात हाेता.
- मृतदेहांच्या तोंडात घातला शेवटचा घास- पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर आराेपी सूरजने या दाेघींच्या ताेंडात जेवणाचा शेवटचा घास घातला. पोलिसांनी पंचनामा सुरू केला, तेव्हा दोघींच्या तोंडात पाेळी व भाजीचा घास दिसून आला.