सचिन राऊत /अकोलाअकोला शहरासह जिल्हय़ात डेंग्यूचा उद्रेक झाला असून, गत दोन महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात शेकडो रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र खासगी रुग्णालयातील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती संबंधित यंत्रणेकडे सादरच करण्यात आली नाही. त्यामुळे डेंग्यूसारख्या गंभीर साथरोगावर उपाययोजना करण्यात शासकीय यंत्रणांपुढे अडचणी येत आहे. त्यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने डेंग्यूच्या रुग्णांची माहिती दडविणार्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हय़ातील ५१ गावांसह अकोला शहर व बाळापूर शहरात गत दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. एप्रिलपासून या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांकडून डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यात येत नसल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला अडचणीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ रुग्ण डेंग्यूने पॉझिटिव्ह आढळले असून, इतर शासकीय रुग्णालयात ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रोज पाच ते सहा डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असले तरी त्यांची माहिती संबंधित डॉक्टरांकडून आरोग्य यंत्रणेला देण्यात येत नाही. त्यामुळे डेंग्यूचा उद्रेक झालेल्या परिसराचा शोध घेण्यास आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. अकोला शहरातील खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाने शोध घेतल्यानंतर प्रत्येक रुग्णालयात डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण त्यांना आढळून आले.
खासगी डॉक्टरांना कारवाईचा ‘डोस’!
By admin | Updated: October 27, 2014 01:31 IST