आशीष गावंडे /अकोला
निवडणूक रिंगणातील दिग्गज उमेदवारांची फौज पाहता, अकोला पूर्व मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात मराठा उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून मराठा मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. मतांच्या ध्रुवीकरणाचा नेमका कोणाला फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची प्रचंड संख्या आहे. निवडणूक रिंगणात तब्बल २५ उमेदवारांनी शड्ड ठोकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्यावतीने गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष वसंतराव धोत्रे, काँग्रेसचे डॉ.सुभाषचंद्र वामनराव कोरपे, भाजपचे रणधिर प्रल्हादराव सावरकर, भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने हरिदास पंढरी भदे यांसह अपक्ष विजय ओंकारराव मालोकार यांचा समावेश आहे. अकोला पूर्व मतदारसंघाचा आजवरचा आढावा घेतला असता, या मतदारसंघात मराठा मतांचे विभाजन नेहमीच इतर उमेदवारांच्या पथ्यावर पडले आहे. यंदाच्या निवडणुकीत एक, दोन नव्हे तर मराठा समाजातील चक्क चार उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. शिवाय, शिवसेनेची परंपरागत व्होट बँक फोडण्याचे कामदेखील क ाही प्रमुख उमेदवारांकडून होण्याची दाट शक्यता आहे. साहजिकच, आपापल्या पक्षाची व्होट बँक सांभाळून ठेवण्यासह इतर मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार, हे निश्चित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अपक्ष उमेदवाराची सर्व भिस्त मराठा मतांवर असल्याने अकोला पूर्व मतदारसंघात मराठा मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, यावर खमंग चर्चा रंगली असून अनेकांचे लक्ष मतदारसंघाकडे लागले आहे.