अकोला: मारहाणीतील जखमींची तपासणी करून पोलिसांना देण्यात आलेल्या जखमींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरील स्वाक्षरीची चौकशी करण्यासाठी पत्र दिल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक हजर न झाल्याने, न्यायालयाने त्यांना नोटी बजावून २९ मार्चपर्यंत न्यायालयात बाजू मांडण्यास बजावले आहे. जुन्या वादातून ८ जानेवारी २00५ रोजी खंगरपुर्यात दोन गटात हाणामारी झाली होती. यात तीन जण जखमी झाले होते. पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात जखमींना दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी जखमींची तपासणी केली आणि पोलिसांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. त्यावर तपासणी करणार्या डॉक्टरने स्वाक्षरी केली होती. पुढे आरोपींना दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र तपासले असता, त्यावर तपासणी करणार्या डॉक्टरने नाव नमूद केलेले नव्हते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया रखडली. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र पाठविण्यात आले; परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांनी पत्रास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांना नोटीस बजावली आणि २९ मार्चपर्यंत बाजू मांडण्यास हजर राहण्याचे आदेश दिले.
जिल्हा शल्य चिकित्सकांना न्यायालयाकडून नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:11 IST