आकोट: संवेदनशील आकोट शहरात गणरायाच्या मिरवणूक मार्गावर खड्डय़ांचे विघ्न निर्माण झाले आहे. अशा स्थितीत चंद्रावरच मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव गणराया सोबतच भक्तांना येणार आहे. शहारातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्ते हजारो खड्डय़ांनी व्यापले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वाढत आहे. या चाळणी झालेल्या मार्गावरील खड्डय़ांमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार असल्याचे दिसते. त्यामुळे वेळप्रसंगी भविष्यातील घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.विविध प्रभाग व कॉलनीतील गणपती विर्सजनाकरिता रांगेत लागण्याकरिता येतात; परंतु अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे गणरायांच्या आगमन मार्गावर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील जवाहर मार्ग, अकोला मार्ग, अंजनगाव मार्ग, मच्छीसाथ, शिवाजी चौक, सोनू चौक, नया प्रेस, शौकत अली चौक, याकुब चौक, बारगण तसेच इतर शहरातील अंतर्गत रस्त्यामधील खड्डय़ातून वाट काढावी लागत आहे. शहरात ८८ गणपती मंडळाची स्थापना झाली आहे. विविध मोहल्ल्यांमधून मिरवणूक काढली जाणार आहे. शहरात आधीच रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. शिवाय रस्त्यावर रेती, शेणखताचे ढिगारे साचले आहेत. विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे अंधारात खड्डे दिसून येत नसल्याने कसरत करावी लागणार आहे. सोनू चौकासह इतर चौकामधील नालीवर टाकलेल्या लोखंडी जाळय़ा उखळल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. शिवाय रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बिकट प्रसंग ओढावत आहे. पावसाळय़ांचे दिवस असल्याने खड्डे पाण्याचे डबके झाले आहेत. पाणी भरल्याने रस्ते दुरुस्तीमध्ये अडचणी येणार आहेत. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने खड्डे पाण्याने भरले आहेत. काही भागात तर रस्ते पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्ता शोधत मार्ग काढावा लागत आहे. भविष्यातील उत्सव पाहता पावसाळय़ापूर्वीच खड्डे डाबंरीकरणाने बुजविणे आवश्यक होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांच्या व्यवस्थेकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे; परंतु मिरवणूक उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, यांची दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.
विसर्जन मार्गावर खड्डय़ांचे ‘विघ्न’
By admin | Updated: September 1, 2014 20:02 IST