आमचं गाव, आमचा विकास योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करीत असताना, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जेवण आणि लेखन साहित्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून निविदा बोलवावी लागते. शिवाय प्रति प्रशिक्षिणार्थींना उत्कृष्ट जेवण, दोन वेळा नाश्ता, दोन वेळा चहा, स्टेशनरी लेखन साहित्यासाठी प्रतिव्यक्ती ८०० रुपये जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत देण्यात येतात. मात्र शासनाचा हा खर्च व्यर्थ जात आहे. असे चित्र बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत पाहावयास मिळाले. कार्यशाळेमध्ये कितीही उत्कृष्ट जेवण दिले तरी, प्रत्येकी ८०० रुपये खर्च लागू शकत नाही. कार्यशाळेवर दाखविलेला खर्च हा नियमबाह्य असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. शासनाच्या उद्देशानुसार आमचं गाव, आमचा विकास, या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला प्राप्त होणाऱ्या १५ व्या आयोगांतर्गत निधीमधून विविध विकासकामे, पारदर्शकपणे, आणि नियोजनबद्ध वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी तालुका स्थरावर सरपंच, ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केल्या जाते. मात्र शासन निर्णयानुसार खर्च होत नसून आपल्या मर्जीतील लोकांना जेवणाचा कंत्राट दिला जातो. घेतलेल्या कार्यशाळेच्या खर्चाचा कुठेही ताळमेळ नसल्याने आणि लोकांना दर्जेदार जेवण, लेखन साहित्य मिळत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सीईओ सौरभ कटियार यांनी या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी होत आहे.
बार्शीटाकळी पंचायत समितीने घेतलेल्या कार्यशाळेमध्ये दर्जेदार जेवण, उत्कृष्ट लेखन साहित्य दिल्या जात नाही. मात्र प्रतिव्यक्ती ८०० रुपये खर्च केल्याचे दर्शविण्यात येते. परंतु निकृष्ट साहित्य वापरून यापेक्षा कमी खर्च करण्यात येतो. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने, घोळ होत आहेत.
- भाग्यश्री संजय चौधरी, सरपंच खेरडा खुर्द
आमचं गाव, आमचा विकास कार्यशाळेतील निधीमध्ये घोळ होत आहेत. प्रति व्यक्ती ८०० रुपये खर्च करावा असे अपेक्षित असताना, निकृष्ट दर्जाचे जेवण व लेखन साहित्य देऊन उर्वरित रकमेवर डल्ला मारण्यात येत आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी.
- महेंद्र पाटील गाढवे सरपंच, धाकली,
आम्ही शासन निर्णयानुसार चांगले जेवण देतो आणि लेखन साहित्यसुद्धा चांगले देतो. आम्हाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून कार्यशाळेचे अजून २० टक्के पैसे मिळायचे आहेत. काही त्रुटी असतील. त्यात दुरुस्ती करण्यात येईल.
-रमेश चव्हाण, सहायक बीडीओ पंचायत समिती बार्शीटाकळी