अकोला : कृषी विभागाशी समांतर कृषी विस्तारात काम करणारी कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या विभागाला यावर्षी एक रुपयाही निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांना खीळ बसली आहे. दरवर्षी शासनाकडून निधी देण्यात आखडता हात घेतला जात असल्याने अडचणी वाढल्या आहे.
कृषी विभागाचे विस्ताराचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने केंद्र सरकारने २०१२ पासून ‘आत्मा’ विभाग सुरू केला. शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, सामूहिक शेती, शेतकरी सहली यांसारख्या उपक्रमांना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून शेतीविषयक नवतंत्रज्ञान देण्याचे काम आत्माकडे दिले. आत्मांतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गट स्थापन झाले आहेत. आत्मा योजनेच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे; परंतु या विभागाला सुरुवातीपासून निधी देण्यास आखडता हात घेतला जात आहे. मंजूर निधीपैकी निम्माही निधी या विभागाला मिळत नाही. खरीप हंगाम सुरू झाला असल्यावरही या विभागाला कुठलाच निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाविषयी सर्व कामे खोळंबली आहे.
दोन कोटी ६२ लाख रुपये निधी असतो मंजूर
विशेष म्हणजे ‘आत्मा’वर खर्च होणाऱ्या या निधीत जवळपास ६० टक्के वाटा केंद्र सरकारचा आहे, तर ४० टक्के वाटा राज्याचा आहे. जिल्ह्याला दोन कोटी ६२ लाख रुपये निधी मंजूर असतो; परंतु दरवर्षी अपेक्षित निधी प्राप्त होत नाही.
मागीलवर्षी मिळाले केवळ एक कोटी
जिल्ह्यातील आत्मा यंत्रणेला मंजूर निधीपैकी पूर्ण निधी प्राप्त होत नाही. मागीलवर्षी या यंत्रणेला एक कोटी एक लाख सात हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे प्राप्त निधीमध्येच काम भागवावे लागत आहे. यामुळे हजारो शेतकरी बांधवांनी आर्थिक, सामाजिक प्रगती साधली आहे. असे असताना आत्मा योजनेसाठी निधी न पाठवून सरकारने स्वत:हून योजनेला खीळ बसवली आहे.
आत्मांतर्गत होतात ही कामे
आत्मांतर्गत प्रगत तंत्रज्ञान, नवीन प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात यंत्रणा अग्रेसर राहिली असून, त्यांना गरजेवर आधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, थेटमाल विक्री, धान्य महोत्सव विविध योजना शेतकऱ्यांना देण्याचे काम आत्मा यंत्रणेमार्फत केले जात आहे.