अकोला: थकीत देयकांच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण पुकारलेल्या जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांचा मंडप उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरला मध्यरात्री हटवला. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी संतप्त कंत्राटदारांनी चक्क महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात गाद्या टाकून ठिय्या आंदोलन छेडले. या प्रकरणी कंत्राटदारांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.मनपा जलप्रदाय विभागामार्फत सबर्मसिबल, हातपंप, जलवाहिनी दुरुस्तीची कामे करणार्या कंत्राटदारांचे २ कोटी ३0 लाखांचे देयक थकीत आहे. जुलै २0१४ मध्ये संबंधित कामाचा कंत्राट संपल्यानंतर पुढील कामासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली; परंतु मागील सहा महिन्यांचे थकीत देयक अदा केल्यानंतर पुढील कामाच्या निविदा स्वीकारण्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली. या मुद्यावर प्रशासनाकडून कंत्राटदारांचे थकीत देयक अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाची भूमिका लक्षात घेत, कंत्राटदारांनी १८ ऑक्टोबर २0१४ पासून मनपालगत बेमुदत उपोषण छेडले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून १४ नोव्हेंबर रोजी १३ कंत्राटदारांनी मनपा आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावल्याने कंत्राटदारांनी पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कंत्राटदारांवर लाठीहल्ला चढविला. अचानक उपायुक्त चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री उपोषणकर्त्यांंचा मंडप जेसीबीच्या मदतीने हटविण्याची कारवाई केली. मंडप काढल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. दुपारनंतर मनपाच्या प्रवेशद्वारालगत कंत्राटदारांनी उपोषण सुरू ठेवले.
उपायुक्तांनी हटविला मंडप उपोषणकर्त्या कंत्राटदारांचा
By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST