‘संपदा सोहळा नावडे मनाला... लागला टकळा पंढरीचा... जावे पंढरीसी आवडे मानसी... कधी एकादशी आषाढी हे...’ या संत वचनानुसार सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षीप्रमाणेच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून पायदळ वारीला शासनाने प्रतिबंध केला आहे; परंतु प्रतिवर्षीच्या परंपरेनुसार श्री संत भास्कर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी औपचारिक प्रस्थान करण्यात आले. तत्पूर्वी, श्री संत भास्कर महाराज व श्री संत वासुदेव महाराज यांच्या चरण पादुकांचा अभिषेक होऊन आरती झाली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष ह.भ.प. अशोक महाराज जायले, पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. मोहन महाराज रेळे, मंगेश महाराज ठाकरे, धनंजय जायले, सोपान रेळे, योगेश जायले, शिवशंकर जायले, सुरेश वाघ आदी मंडळी उपस्थित होती. संत वासुदेव महाराज निवासस्थान अकोट येथे श्रींच्या पालखी सोहळ्याचे पूजन व आरती संपन्न झाली. पुढील मुक्काम श्री संत वासुदेव महाराज वैष्णव ज्ञान मंदिर, वडाळी सटवाई येथे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत राहील.
फोटो:
पंढरपूर वारीसाठी आयुक्तांकडे परवानगी
मागीलवर्षी श्री संत भास्कर महाराज यांच्या पादुकांना रुक्मिणीदेवी संस्थान, कौंडण्यपूर यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मानाचे स्थान मिळून श्रींची पंढरपूर वारी करणे शक्य झाले. यावर्षीसुद्धा श्रींचा पालखी सोहळा व वारी अखंड कायम राहावी व किमान १० वारकऱ्यांना श्रीक्षेत्र पंढरपूर वारी करता यावी. याबाबत विभागीय आयुक्त, अमरावती यांना श्री संत भास्कर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीक्षेत्र आकोली जहागीरतर्फे विनंती करण्यात आली असल्याचे ह.भ.प. अशोक महाराज जायले यांनी सांगितले.