कारंजा लाड : वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील तीन वर्षीय बालकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आधीच दुष्काळसदृश वातावरणात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने आरोग्य विभागाने सतर्क होणे गरजेचे झाले आहे. मानोरा येथील तीन वर्ष वयाच्या मैत्रेय डोंगरे याला ताप असल्यामुळे उपचार घेण्याकरिता कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मैत्रेयकडून वैद्यकीय उपचारास प्रतिसाद मिळत नाही, हे पाहून वैद्यकीय चाचणीमध्ये त्याला डेंग्यू आजार असल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचाराकरिता रुग्णास अकोला येथे पाठविण्यात आले आहे. या कीटकजन्य साथ आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे आहे. कारंजा व मानोर्यासह तालुक्यातील गावांत फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यशवंत टेकाडे यांनी डेंग्यूचा फैलाव हा डासांपासून होत असून, यामुळे तापाच्या साथीमध्ये वाढ होत असल्याचे सांगीतले. काही रुग्णांना जास्त दिवस ताप राहिल्यास डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात. रुग्णांना आवश्यक ते उपचार कारंजा ग्रामीण रुग्णालयात देण्यात येत आहे. प्रतिजैविके व सलाईनचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले.
कारंजात डेंग्यूचा रुग्ण आढळला
By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST