बार्शीटाकळी : सध्या तालुक्यासह जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रचाराला वेग आला आहे. यासाठी प्रशासनानेसुद्धा तयारी केली असून, निवडणुकीच्या कामासाठी माध्यमिक शाळांच्या सर्वच कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. सध्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने मुख्याध्यापक व लिपिकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी विदर्भ मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, अकोला जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली असून, निवडणुकीच्या कामासाठी माध्यमिक शाळांच्या सर्वच कर्मचाऱ्यांची यादी शाळांमधून मागविण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या सभादेखील झाल्या आहेत. सद्यस्थितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा फाॅर्म भरण्याचे काम सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व लिपिकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी विदर्भ मुख्याध्यापक संघाने बार्शीटाकळीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना विदर्भ मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे रमेश चव्हाण, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष दिनकर गायकवाड, शिक्षक आघाडीचे प्राचार्य गजेंद्र काळे, मुख्याध्यापक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (फोटो)