अकोला: औद्योगिक वसाहत परिसरात विविध कारणे समोर करून पैशांची मागणी करणार्या राजस्थान येथील सात मुलींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलींची चौकशी केली असता अकोल्यात राजस्थानमधून तब्बल २0 मुली आल्याची माहिती त्यांनी दिल्यानंतर या मुलींचा शोध घेण्यात येत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या सतर्कतेमुळे या मुलींना शोधण्याचे काम तातडीने सुरू झाले आहे.राजस्थान येथील १५ ते २0 वर्ष वयोगटातील २0 मुली आणि त्यांच्यासोबतच ३0 वर्ष वयोगटातील दोन महिला अशा प्रकारे एकूण २२ महिला आणि मुली अकोल्यात दाखल झालेल्या आहेत. या मुलींनी विविध प्रकारचे कागद प्रकाशित केले असून यावर आरोग्याचे कारण समोर करून पैसे मागण्यात येत आहेत. एवढेच नाही तर अकोल्यातील काही लोकांच्या नावे तब्बल १ हजार रुपये देणगी मिळाली ५00 रुपये देणगी मिळाल्याचे दस्तावेजही या मुलींकडे आहेत. अशाच प्रकारच्या सात मुली औद्योगिक वसाहत परिसरात फिरत असताना खंडारे यांनी त्यांची चौकशी केली. तर मुलींनी एकूण २२ मुली अकोल्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलींना ताब्यात घेऊन दक्षता पथकाकडे देण्यात आले आहे. या मुलींचे समुपदेशन करून त्यांना राजस्थान येथे पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती शिरीष खंडारे यांनी दिली.
पैसे मागणा-या मुली पोलिसांच्या ताब्यात!
By admin | Updated: July 27, 2016 01:47 IST