अजय डांगे /अकोला
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया बुधवारी आटोपल्यानंतर, अकोला पश्चिम मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असून, अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नेहमीच जात, धर्माच्या आधारे मतदान होते. या मतदारसंघात हिंदू, मुस्लीम, दलित मतदारांचे कमी जास्त प्रमाणात प्राबल्य आहे. यावेळच्या निवडणुकीत आघाडीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि युतीमधील शिवसेना व भाजपने स्वतंत्र लढत असल्याने सर्वच समाजाच्या मतांचे मोठय़ा प्रमाणात विभाजन होणार आहे. मुख्य लढत ही भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा, शिवसेनेचे गुलाबराव गावंडे, कॉँग्रेसच्या उषा विरक राष्ट्रवादी कॉँग्रसेचे विजय देशमुख आणि भारिप-बमसंचे आसिफ खान मुस्तफा खान, यांच्यात होणार आहे. या मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे काझी नाझिमोद्दिन व नगरसेवक नकीर खान यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील मतांचे विभाजन थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल. या मतदारसंघात एकूण २ लाख ७४ हजार ५९३ मतदार आहेत. या मतदारसंघातील जवळपास ८0 हजार मुस्लीम समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत.