मेडशी (जि. वाशिम), दि. २९ : मेडशी येथील कावडधारी शिवभक्ताचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली. मनोज वासुदेव चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.श्रावणमासातील शेवटचा सोमवार असल्याने येथील महादेव मंदिराकडे गावातून मिरवणूक निघाली होती. शिवशंभो शिवभक्त कावड मंडळाचे कावडधारी मोठय़ा हर्षोल्हासात जात असताना, विजेच्या खांबावरुन लोंबकळत्या जिवंत तारास कावडचा लोखंडी भागाचा स्पर्श झाला. यामुळे सात जणांना विजेचा जबर धक्का बसला. सर्वांंना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने निखिल पाल (२८), योगेश चव्हाण (३0), नितिन कुदडे (२८), अभिजित राठोड (१४), मनोज वासुदेव चव्हाण (१७) यांना अकोला येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले. तिथे मनोज वासुदेव चव्हाण या युवकाचा मृत्यू झाला. घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
विजेच्या धक्क्याने कावडधारी शिवभक्ताचा मृत्यु
By admin | Updated: August 30, 2016 01:11 IST