संतोष येलकर /अकोला
रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात जवाहर विहीर व धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण असलेली विहिरींची कामे पूर्ण करण्यास ३0 जून २0१५ पर्यंत शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. विहिरींची कामे पूर्ण करण्यास यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसून, कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सन २00७-0८ आणि २00८-0९ मध्ये ५१ हजार ८00 जवाहर विहिरी आणि ८३ हजार २00 धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट शासनामार्फत ठरवून देण्यात आले होते. या योजनांतर्गत विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वाढ करुन अडीच लाखापर्यंत अनुदान करण्याचा निर्णय गतवर्षी शासनामार्फत घेण्यात आला.त्या निर्णयानुसार सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै २0१४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.परंतू या मुदतीत अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी आता ३0 जून २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत २२ डिसेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार, विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांमधील अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची कामे कोणत्याही परिस्थितीत ३0 जून २0२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन, विहीत कालावधीत सिंचन विहिरींची कामे पूर्ण होतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले. तसेच या कालावधीत सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारादेखिल शासनाच्या रोहयो विभागामार्फत निर्गमीत करण्यात आलेल्या निर्णयात देण्यात आला आहे.