ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ६ - शेतकरी दिवसेंदिवस प्रयोगशील बनत चालला आहे. उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनासहच विविध क्लुप्त्या लढवून प्रयोग करीत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील समर्थ भगत नामक शेतक-याने फुलकोबीची सरीवरंबा पध्दतीने लागवड करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
चांभई येथील प्रगतशील समर्थ केशवराव भगत हे नेहमी वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यांनी यंदा खरीप हंगामातही शेतात मल्चिंग पद्धतीने त्यांनी तूर आणि सोयाबीन या पिकाची पेरणी केली असून, याच पिकांत फुलकोबीची लागवडही केली आहे.
या पिकासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा आधार घेतला आहे. पेरणी करताना सोयाबीन तीन ओळी, एक ओळ तूर आणि दोन ओळी फुलकोबी अशी लागवड त्यांनी केली आहे. यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांचे आजपर्यंतच्या यशस्वी प्रयोगानंतर म्हणणे आहे.