शहराची वाढती लाेकसंख्या लक्षात घेता, भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाच्या ‘अमृत’याेजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली जात आहे. यासाठी मंजूर झालेल्या ११० काेटी रुपयांतून मनपाने ८७ काेटी रुपयांची निविदा प्रसिध्द करीत कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. आजराेजी जलवाहिनीचे जाळे टाकणे व ८ नवीन जलकुंभ उभारण्याचे काम सुमारे ८२ टक्के पूर्ण झाले आहे. जलवाहिनीचे जाळे टाकताना, जलवाहिन्यांना गळती लागण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यादरम्यान, मनपा प्रशासनाकडून जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी तीन काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी जानेवारी महिन्यापर्यंत कंत्राटदारांना ३० लाख रुपये देण्यात आले असून, काही देणी थकीत असल्याची माहिती आहे.
महिन्याभरापासून लिकेज
शहरातील सिंधी कॅम्प राेड परिसरात मागील महिन्याभरापासून जलवाहिनीला गळती लागल्याचे दिसून येते. यामधून लाखाे लिटर पाण्याचा अपव्यय हाेत असून, जलवाहिनीच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
३,०००००००
जलवाहिनीच्या देखभाल-दुरूस्तीपाेटी वर्षाचे बजेट
३,०००००००
पाणीपुरवठ्यावरील वर्षाचे वीजबिल
२२२
पाणीपुरवठा संदर्भातील एकूण कर्मचारी
लिकेजमुळे १७ टक्के पाणी वाया
मागील तीन वर्षांपासून शहरात जलवाहिनीचे जाळे टाकले जात असल्याने जाेडणी करताना पाण्याचा अपव्यय हाेत आहे. त्यामुळे लिकेजचे प्रमाण १५ ते १७ टक्के असल्याची माहिती आहे. अद्यापही शहराच्या विविध भागात जलवाहिनी अंथरणे सुरूच असून, हे काम ८२ टक्के झाले आहे.
शहरात ४५० किमी पेक्षा अधिक लांब अंतरासाठी नवीन जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच नवीन आठ जलकुंभांपैकी ७ जलकुंभांची उभारणी झाली आहे. पुढील काही दिवसांत लिकेजच्या प्रमाणात घट येइल, असा विश्वास आहे.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा