अकोला : चंद्रपूरमधील जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी मंगेश तुकाराम मुंगणकर (२५) याला आरोपी शिक्षक आर.बी. गजभिये व शैलेश रामटेके यांना त्याच्या घरामध्ये आश्रय देणे चांगलेच अंगलट आले. मंगेश हा चंद्रपूर येथील नवोदय विद्यालयामध्ये शिकत असताना त्याला गजभिये हे शिक्षक होते. त्याच्या मार्गदर्शनाची परतफेड म्हणून मंगेशने आरोपींना मदत केल्याचे तपासात स्पष्ट झाले. अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी पोलिसांनी आर.बी. गजभिये, शैलेश रामटेके, संदीप लाडखेडकर यांना अटक केली. अटकेपूर्वी गजभिये व रामटेके यांनी नागपूर येथील त्यांचा विद्यार्थी मंगेश मुंगणकर याच्या नागपुरातील भगवानपुर्यातील घरी आश्रय घेतला होता. ८ ते १0 वर्षांंपूर्वी मंगेश हा चंद्रपुरातील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकायला होता. त्यावेळी गजभिये तेथे शिक्षक होते. तेव्हापासून मंगेश व गजभियेची ओळख होती. गजभियेने एकेकाळी केलेल्या मार्गदर्शनाची परतफेड करावी म्हणून मंगेशने दोघा आरोपींना आश्रय दिला. एवढेच नाहीतर त्यांना लपवून ठेवले आणि न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी सुद्धा खटाटोप चालविला होता; परंतु आरोपींना मदत करणे मंगेशच्या चांगलेच अंगलट आले. आरोपींना आश्रय दिल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यालाच गजाआड केले.
आरोपी शिक्षकांना आश्रय देणे पडले महागात
By admin | Updated: April 6, 2015 02:12 IST