पातूर : तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून, दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी कोरोनामुळे पातूरच्या माजी पंचायत समिती उपसभापतीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ११७वर पोहोचली असून, आतापर्यंत १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पातूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरले असून, सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पातूर पंचायत समितीचे माजी सभापती कालुसिंग राठोड यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यात आठवडाभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ११७वर पोहोचली आहे.
पातूर तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये ११३३ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ९९९ रुग्ण मुक्त झाले तर ११७ जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तालुक्याची लोकसंख्या एक लाख ३२ हजार एवढी आहे. आतापर्यंत १० हजार ६४० लोकांनी रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट करून घेतली आहे. त्यामध्ये ८३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बरे होण्याचा दर चांगला असला तरी, बाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे.
लसीकरण मोहीम थंडावली
पातूर तालुक्यात सुरू झालेली लसीकरण मोहीम साठ्याअभावी थंडावली आहे. तालुक्यात आतापर्यंत ५८२६ नागरिकांनी लसीकरण केले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी १६ केंद्रांवर लस देण्यात येत हाेती. आता केवळ पाच केंद्रांवर लस देण्यात येत आहे. येथील लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच शिर्ला, माळराजुरा, खानापूर, चोंढी ,चरणगाव, अंबाशी आणि ग्रामीण रुग्णालय चतारी केंद्र बंद करण्यात आले आहे. चतारी ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.